१० वी पास ‘शास्त्रज्ञा’चा पर्दाफाश!

Rokhthok Maharashtra 2 0

१० वी पास ठगबाजाचा ‘सायंटिस्ट’ बनून धुमाकूळ
​मॅट्रिमोनी साईटवर जोडीदार शोधताना सावधान! कारण स्वतःला ‘इस्त्रो’चा शास्त्रज्ञ सांगून उच्चशिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या एका महाठगाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे हा ‘हायप्रोफाईल शास्त्रज्ञ’ प्रत्यक्षात फक्त १० वी पास आहे!
आदर्श म्हात्रे… वय वर्ष २१, पण कारनामे वाचून पोलिसांचेही डोके चक्रावून गेलेत. मॅट्रिमोनी साईट्सवर १२ वेगवेगळ्या नावांनी बनावट प्रोफाईल्स तयार करून याने अनेक महिलांची फसवणूक केली. कधी इस्त्रोचा शास्त्रज्ञ, कधी नामांकित डॉक्टर, तर कधी बँक अधिकारी… अशी खोटी ओळख सांगून त्याने महिलांचा विश्वास संपादन केला.

तो केवळ खोट्या ओळखी सांगत नव्हता, तर बनावट कागदपत्रेही सोबत ठेवायचा. लग्नाचे आमिष दाखवून त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आणि वैयक्तिक अडचणींचे कारण सांगून लाखो रुपये उकळले. नवी मुंबई, मुंबई, पुणे आणि नागपूर अशा अनेक शहरांत याने आपला जाळं पसरवलं होतं.
अखेर नवी मुंबई पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फसवणूक झालेल्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोशल मीडिया किंवा मॅट्रिमोनी साईट्सवर ओळख झालेल्या व्यक्तीची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.