फुरसुंगीत भरधाव हायवा डंपरची दुचाकीला धडक; २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू!
पुणे-सासवड रस्त्यावर भीषण अपघात! भरधाव हायवा डंपरने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मोटारसायकल चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
माधुरी सतीश जाधव (वय २३, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे मृत तरुणीचे नाव आहे. त्या उंड्री येथील एका कंपनीत कामाला जात होत्या.
शनिवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथील भोसले व्हिलेज गेटसमोर हा अपघात झाला. माधुरी या अभिजित ज्ञानदेव जाधव यांच्या मोटारसायकलवरून भेकराईनगरहून मंतरवाडीकडे जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव हायवा डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात माधुरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अभिजित जाधव गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला.
याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी डंपरचालक मनोहर रामदास हाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे पुढील तपास करत आहेत.





