पुणेहडपसर

एस. एम .जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने माशेलकरांवरील परिसंवाद संपन्न

हडपसर (प्रतिनिधी)

प्रत्येकालाच आपली मातृभाषा उत्तम यायला हवी.भरपूर वाचन केले पाहिजे. वाचन करून प्रगल्भ व्हा. स्वतःचे ग्रंथालय असले पाहिजे.चरित्रे वाचून आपले चारित्र्य घडवा. डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रतिकूलतेतून घडले. मराठी माणूस ज्ञानाच्या, वाचनाच्या बळावर मोठा होऊ शकतो. हे माशेलकरांनी दाखवून दिले. ज्ञान ही एक मोठी शक्ती आहे. अभ्यासातूनच मोठे व्हा.

चरित्र वाचल्यावर चारित्र्य घडते , असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यांनी केले .ते मराठी गौरव दिन प्रसंगी आयोजित केलेल्या “चरित्र आत्मचरित्र व आत्मकथन विशेष संदर्भ दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर” या विषयावरील परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम.जोशी कॉलेजमध्ये बोलत होते. मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम व वैश्विक कला पर्यावरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता.

 

उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर जाधव होते. ते म्हणाले की, चरित्रकार हा जाणकार असतो. चरित्र लिहिणारा चरित्रकार विशिष्ट उंचीचा असला तरच तो सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो. माशेलकर हे समाजाचे नायक आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य श्रेष्ठ आहे. मराठीतील सुंदर कलाकृतींचा आस्वाद घेतला पाहिजे.स्मृतिचित्रे, श्यामची आई ,कऱ्हेचे पाणी या कलाकृतींची निर्मिती प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे.

हळदीचे आणि बासमतीचे पेटंट जिंकणारे माशेलकर श्रेष्ठ आहेत, असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम यांनी केले.आभार प्रा. धीरेंद्र गायकवाड यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील सर्व प्राध्यापक तसेच प्रा. तृप्ती हंबीर, प्रा. गणेश जाधव ,डॉ. संदीप वाकडे ,प्रा.शुभम तांगडे, प्रा.पुनम तडके यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संजय जडे, सर्व प्राध्यापक विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.