पुणेमहाराष्ट्र

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी

राज्यात होणाऱ्या अत्याचाराच्या व गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून राज्यातील महिला, तरुणी व विद्यार्थी हे असुरक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या खून, दरोडे व प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकाच आठवड्यात एमपीएससी करणाऱ्या दोन मुलींसोबत असे प्रकार घडले. यात दर्शना पवार नावाच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला, तर काल झालेल्या दुसऱ्या हल्ल्यातील ती तरुणी थोडक्यात बचावली. राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास असमर्थ ठरणाऱ्या गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथील आंदोलनात करण्यात आली.

 

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ” शहराला राज्याची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर म्हणून नावलौकिक आहे. परंतु गेल्या काही दिवसात विद्यार्थिनींवर होणारे हल्ले आणि कोयता गॅंगचा उच्छाद यासाठी पुणे शहर कूप्रसिद्ध होत आहे, याला सर्वस्वी जबाबदार स्वतःला आधुनिक पुण्याचे शिल्पकार म्हणून घेणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. आदरणीय अजितदादा या शहराचे पालकमंत्री असताना दर आठवड्याला प्रशासकीय बैठका घेऊन कायदा सुव्यस्थतेचा आढावा घेत असत, फडणवीस सरकार आल्यापासून अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या बैठका पालकमंत्र्यांनी घेतल्या आहेत. दररोज पुणे शहरात ठिक- ठिकाणी खून,लुटमार, प्राणघातक हल्ले, दहशत माजविणाऱ्या टोळ्या अशा विविध बातम्या पाहायला मिळतात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील गृहमंत्री अथवा पालकमंत्री या घटनांकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

मुळात या सरकारचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याबाबत आम्हाला शंका आहे. ज्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, महिला बालकल्याण मंत्री देखील पुरुषच आहे अशा लोकांकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा ठेवणे गैर आहे. गृहमंत्र्यांनी तातडीने झालेल्या घटनांची जबाबदारी स्वीकारत आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत, अन्यथा या पुढील काळात पुन्हा अशा घटना घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

या आंदोलन प्रसंगी प्रशांत जगताप, सुषमा सातपुते, किशोर कांबले, महेश हांडे, गणेश नलावडे, करीम शैख, शिवानी मालवदकर, दीपक कामठे, सानिया झुंझारराव, संदीप बालवडकर आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.