पुणे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद : रुपालीताई चाकणकर पुणे – बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उदघाटन

ग्रामीण भागामधून गुणवंत खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देते. संवेदनशील विचारांचे नेतृत्व असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक आलेख उंचावत केलेली प्रगती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त व उद्योजक विठ्ठलशेठ मणियार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी आॅल इंडिया सायकल फेडरेशनचे आनंद सिंग, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिपक मानकर, माजी स्थायी समिती सभापती बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, अनंता नागरी सह बँकेचे चेअरमन शिवाजी काळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सायकल असोसिएशनचे प्रताप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करत असतात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेची संकल्पना स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करत विविध सामाजिक संदेश देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे नमूद केले.
आपल्या मनोगतामध्ये विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त व उद्योजक मा. विठ्ठलशेठ मणियार यांनी मागील अनेक वर्षांपासून या सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत असल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभिनंदन करत उत्तम शारिरीक तंदुरूस्तीसाठी शक्य तेथे शरीरराचा वापर करण्याचा सल्ला दिला.
यावेळी आॅल इंडिया सायकल फेडरेशनचे आनंद सिंग, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिपक मानकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

बारामती हॉस्टेल येथे आयोजित या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अमृता खराडे, डॉ. नितीन लगड तर आभार प्रदर्शन अनंता नागरी सह बँकेचे चेअरमन शिवाजी काळे यांनी केले. या उद्घाटन सत्राच्या संपुर्ण यशस्वितेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा – महाविद्यालयांचे शाखाप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.