पुणेमहाराष्ट्र

अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यास मारहाण; ससून हॉस्पिटल मधील कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार …!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात एका वार्डाच्या उदघाट्नाच्या कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ससून रुग्णालयातील उद्घाटन पाटीवर नाव नसल्याच्या कारणावरून आमदार कांबळे संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी कानशिलात लगावली अशी माहिती मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर असल्यामुळे सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत.

या दौऱ्यात त्यांनी ससून रुग्णलयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले. कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. परंतु या प्रकारामुळे अजित पवार नाराज झालेले दिसत होते.