पुणेमहाराष्ट्र

… तर जीवंत सोडणार नाही, असे धमकावणाऱ्यांना ठोकल्या बेड्या हडपसर पोलिसांची कामगिरी ः गंगानगरमध्ये लोखंडी हत्यार हवेत फिरवित केला राडा

स्वप्निल कदम
पुणे, दि. १६ ः आमच्याशी पंगा घ्याल तर कोणाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देणाऱ्या दोघांना अटक केली असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभयसिंग सिकंदरसिंग जुनी आणि दिप दिलीप कसबे (दोघे रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे असून, दाद्या ऊर्फ सुदर्शन जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपक शिवराम परिहार (वय २२, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची आई गंगानगरमधील भवानी ट्रेडिंग दुकानामध्ये असताना आरोपींनी लोखंडी हत्यार काढून जीवे मारण्याची धमकी देत काऊंटरचा दरवाजा तोडून हाताने मारहाण केली. आरोपींनी धारदार शस्त्र हवेत फिरवीत आमच्याशी कोणी पंगा घ्यायचा नाही, नाही तर एकेकाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. भीतीने परिसरातील नागरिकांनी घराची दारे बंद करून, दुकानेही बंद केली. परिसरातील नागरिक भीतीने सैरावैरा पळू लागले. दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील, महेश कवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करीत कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.