पुणेमहाराष्ट्रहडपसर

समाजात आधुनिक विचार रुजवण्यासाठी मराठी पत्रकारितेचे मोठे योगदान : प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सत्यशोधकीय पत्रकारितेवर कार्यशाळा

समताधिष्ठीत समाज रचना हा सत्यशोधकीय पत्रकारितेचा उद्देश होता. समाजात आधुनिक विचार रुजवण्यासाठी मराठी पत्रकारितेचे मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक मराठी वृत्तपत्राची भाषाशैली वेगळी असते. एका वृत्तपत्रांत भाषेची अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारचे लेखन विद्यार्थ्यांनी वाचून ती लेखनशैली आत्मसात करायला पाहिजे त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सत्यशोधकीय पत्रकारिता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पत्रकार अशोक बालगुडे, पत्रकार कृष्णकांत कोबल, पत्रकार दिगंबर माने, पत्रकार अनिल मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. या प्रसंगी उपप्राचार्य अनिल जगताप, पत्रकार विवेकानंद काटमोरे, पत्रकार अशोक आव्हाळे, पत्रकार वसंत वाघमारे, पत्रकार रागिणी सोनवणे, पत्रकार अनिल दाहोत्रे उपस्थित होते.

पत्रकार अशोक बालगुडे यांनी वृत्तपत्रातील छापील मजकूरावर लोकांचा आजही विश्वास आहे. वृत्तपत्राचे वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडत असते. भोवतालच्या परिस्थितीविषयी आपल्याला माहिती मिळते असे सांगितले. पत्रकार अनिल मोरे यांनी विद्यार्थीदशेत आपण आपले ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी भरपूर वाचन करा. शिक्षण हे आपल्या आयुष्याची गुरुकिल्ली असून आपण जास्तीत जास्त शिकले पाहिजे असे सांगितले. “प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. सामाजिक बांधिलकी ठेऊन सामान्य माणसांच्या सार्वजनिक समस्या मांडण्याचे काम प्रसारमाध्यमे करत असतात. समाजाला दिशा देण्याचे काम वृत्तपत्र करतात. ” असे मत पत्रकार दिगंबर माने यांनी व्यक्त केले. पत्रकार कृष्णकांत कोबल यांनी “सत्यशोधकीय पत्रकारिता ही स्वातंत्र्य, समता बंधुता मूल्यांना प्रमाण मानते. सत्यशोधन हे पत्रकारितेचे प्रमुख तत्व असते. वाचकांचा पत्रव्यवहार हा लेखन – वाचन समृद्ध करण्याची प्रक्रिया होती. त्यातून वाचकांची वैचारिक घडण होत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचे सत्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अनिता गाडेकर यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संगीता देवकर यांनी केले तर आभार प्रा. नितीन लगड यांनी मानले.