पुणेमहाराष्ट्र

वाहक-चालकांनो बसमध्ये प्रवाशांचा आदर करा सतीश गव्हाणे ः पीएमपी भेकराईनगर आगारामध्ये वाहनशेडचे उद्घाटन

पुणे, दि. ८ ः वाहक-चालक पीएमपीचे मुख्य उत्पादक घटक आहेत. प्रवाशांचे बसमध्ये स्वागत करून त्यांना चांगली सेवा द्या. प्रवाशांचा आदर केला, तर नक्कीच प्रवासी संख्या वाढेल आणि उत्पन्नामध्ये वाढेल. त्याचबरोबर वाहक-चालक, पीएमपीचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल. सुटे पैसे किंवा बसथांब्यावर बस न थांबल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांची गैरसोय होते. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कामगारवर्गाला वेळेत पोहोचायचे असते, एक बसची फेरी रद्द झाली तर पीएमपीचे उत्पन्न कमी होतेच. मात्र, त्याही पेक्षा प्रवाशांची मोठी गैरसोय होते, ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे मत पीएमपी चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे यांनी व्यक्त केले.

पीएमपीच्या भेकराईनगर आगारामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी उभारलेल्या शेडचे उद्घाटन गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पीएमपी नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, स्थापत्य अभियंता निरंजन तुळपुळे, भेकराईनगर आगारप्रमुख सुरेंद्र दांगट-पाटील, हडपसर आगार व्यवस्थापक दीपक वाळुंजकर, सिव्हील कॉन्ट्रॅक्टर माने, दै. प्रभातचे उपसंपादक अशोक बालगुडे, शंकर धमाळ, भेकराईनगर आगारचे ओएस महादेव पोमण, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बालगुडे म्हणाले की, अरुंद रस्ते, वाहनांची खच्चून गर्दी, बसच्या तुलनेत प्रवाशांची खच्चून गर्दी अशा कठीण परिस्थितीमध्ये चालक-वाहकांची कसरत दिसून येत आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रशासनाबरोबर वाहक-चालकांचा प्रयत्न सुरू आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. किरकोळ स्वरूपाचा धक्का वाहनाला धक्का लागला तरी नागरिक चालकाच्या अंगावर येतात, सुटे पैसे किंवा बसथांब्यावर बस थांबविली नाही, तर वरिष्ठांकडे तक्रारी होतात. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने तक्रारदारांच्या तक्रारी आणि वाहक-चालकांच्या अडचणी समजून घेत त्यावर योग्य मार्ग काढला पाहिजे. त्याचबरोबर वाहक-चालकांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.