गेल्या ११ वर्षांपासून केंद्रात RSS प्रेरित सरकार सत्तेवर असून, त्यामुळे “संविधान बदल” या त्यांच्या दीर्घकालीन अजेंड्याला गती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात “संविधान का बदलावे?” या शीर्षकाचे संविधान विरोधी पुस्तक प्रकाशित झाले. पुणे पोलिसांनी फक्त दिखाव्यासाठी काही निर्बंध लादले असले तरी प्रकाशन कार्यक्रम निर्बंधांना धाब्यावर बसवत पार पडला.
या संविधानविरोधी कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट कडून तीव्र निषेध करण्यात आला. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधानाच्या प्रतींचे मोफत वाटप करण्यात आले.
प्रशांत जगताप यांनी ठामपणे सांगितले की, संविधानाला सुरुंग लावणाऱ्या प्रवृत्तींना अभय देणाऱ्या सरकारला आता रोखणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी राज्यातील महायुती सरकारने अशा घटनाविरोधी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
जयदेवराव गायकवाड, रविंद्र माळवदकर, शेखर धावडे, नरेश पगडाल्लु, अनिता पवार, पायल चव्हाण, श्रद्धा जाधव, सुनिल माने, फईम शेख, किशोर कांबले, दिलशाद आत्तार, अजिंक्य पालकर, वसुधा निरभवने, रूपाली शेलार आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.