करोना लसीवर आज दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन प्रमुख शहरांतील वेगवेगळ्या तीन कंपन्यांना भेट देत लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांनी आढावा घेतल्यानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात करणार असल्याची आनंदाची बातमी दिली. जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार करणार असल्याची माहितीही पुनावाला यांनी दिली.
अहमदाबाद, हैदराबादनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज सायंकाळी भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. यानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन लसीसंदर्भात पहिल्यांदाच सविस्तर माहिती दिली. पुनावाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीच्या उत्पादनाची संपूर्ण माहिती देण्यात आली. लसीच्या तयारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले. लसीसंदर्भातील अनेक मुद्यांवर, महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा पंतप्रधानांसोबत झाल्याचेही पुनावाला म्हणाले. जवळपास सव्वातास आढावा पंतप्रधानांनी घेतला.
दरम्यान, अदर पुनावाला पत्रकार परिषदेत म्हणाले की, लसीच्या तिसर्या ट्रायलवर लक्ष आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार असून प्रथम भारतात उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्याला ५ ते ६ कोटी डोसची निर्मितीचे नियोजन आहे. या लसीमुळे ६० टक्के लोकांना रुग्णालयाची गरज पडणार नाही, असा दावाही अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत केला. लोकांपर्यंत लस पोहोचविण्याची तयारी केली जात आहे. लसीच्या तयारीबद्दल पंतप्रधान मोदी समाधानी असून लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी असेल आणि लस सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल, असेही पुनावाला म्हणाले.
दरम्यान, तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.