पुणे, 10 सप्टेंबर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागरिकांच्या तक्रारींना थेट जोडणारी राष्ट्रवादी जनसुनावणी मोहीम जाहीर केली. ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही माध्यमांतून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने ही मोहीम हडपसर येथे १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून पुढे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागांत खास ब्रँडेड कियोस्क उभारले जाणार आहेत. या कियोस्कवर नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदविता येतील. प्रत्येक तक्रारदाराला पावती मिळेल, ज्यामुळे पारदर्शकता व जबाबदारी निश्चित होईल.
डिजिटल माध्यमातून नागरिकांशी संपर्क वाढविण्यासाठी एनसीपीकडून खास व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. यात नागरिक QR कोड स्कॅन करून किंवा मिस कॉल देऊन आपली तक्रार नोंदवू शकतील. लगेच त्यांना पीडीएफ स्वरूपात तक्रारीची प्रिंट मिळेल. ही प्रिंट व आवश्यक कागदपत्रे घेऊन तक्रारदारांना जनसुनावणी स्थळी यावे लागेल.
राष्ट्रवादी जनसुनावणी वैशिष्ट्ये :
तक्रारींसाठी ठिकठिकाणी नोंदणी काउंटर उभारले जाणार.
प्रत्येक तक्रारदाराला वेगळा क्रमांक देऊन तक्रार नोंद केली जाणार.
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष सहभागींसमोर त्यांचे प्रश्न ऐकून त्वरित मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.
सर्व तक्रारी विभागनिहाय नोंदविल्या जातील.
प्रत्येक तीन दिवसांनी अजित पवार स्वतः तक्रारींच्या निवारणाचा आढावा घेतील, विलंब कुठे होत आहे याची नोंद घेऊन संबंधित विभागांना त्वरीत कार्यवाहीचे आदेश देतील. या पद्धतीमुळे केवळ जबाबदारीच वाढणार नाही तर तक्रारींचे निवारणही जलद गतीने होईल.
ही जनसुनावणी मोहीम नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविणे, त्यांचा विश्वास जिंकणे आणि पक्ष व जनतेमधील नातं घट्ट करणं हे उद्दिष्ट ठेवून राबविण्यात येत आहे.