पुणे, — नेशन फर्स्ट आणि चानक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “डिग्लोबलायझेशन अँड इमर्जन्स ऑफ सनातन इकॉनॉमिक्स मॉडेल” या विषयावर विचारमंथन सत्राचे आयोजन विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे, मुंबई, हैदराबाद तसेच कोकण विभागातून ५०० हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली. परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयातील तज्ज्ञ डॉ. अंकित शाह हे या सत्राचे प्रमुख वक्ते होते. भारतकेंद्री भूराजकीय दृष्टिकोन घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
डॉ. शाह यांनी गुरुकुल शिक्षण प्रणालीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, ही प्रणाली स्थिर, स्वावलंबी व संस्कारी नागरिक घडवते, जे परकीय प्रभावांच्या आघातांना समर्थपणे तोंड देऊ शकतात. ते म्हणाले, “फ्रीबीजच्या मोहात पडून काम करण्याची प्रेरणा केवळ प्रोत्साहनांवर आधारित होणे धोकादायक आहे. प्रत्येकाने आत्मनिष्ठेने कार्य करावे आणि समाजावर अवलंबून राहू नये.”
डॉ. शाह यांनी पुढे सांगितले की, येत्या पाच वर्षांत चलन व्यवस्थेतील बदलांमुळे शेती, उत्पादन, लॉजिस्टिक्स, संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातच खरी मूल्यनिर्मिती होईल. ताज्या पदवीधरांना अवास्तव वेतन देणाऱ्या तथाकथित “फेक जॉब्स” लवकरच संपुष्टात येतील.
२०३० नंतर महानगरांतून (पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद) दुसऱ्या-तिसऱ्या श्रेणीतील शहरांकडे व शेतीकडे रिव्हर्स मायग्रेशन सुरू होईल, असे त्यांनी भाकीत केले. २०३५ पर्यंत देशी गाई, स्वदेशी शेती पद्धती यांवर चर्चा पुन्हा केंद्रस्थानी येईल आणि आयटी संस्कृतीकडून कृषी संस्कृतीकडे वळण दिसून येईल.
ते म्हणाले, “बहुपोलार जगात झटपट पगाराचे खोटे रोजगार टिकणार नाहीत. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लेऑफ्स होतील.”
डॉ. शाह यांनी नमूद केले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या कणा असलेल्या मुख्य क्षेत्रांकडून लक्ष हटविण्यासाठी आयटी क्षेत्राला जाणूनबुजून ग्लॅमराइज करण्यात आले. ई-कॉमर्समध्ये डॉलरचे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून लघु व्यापारी व स्थानिक उद्योजकांचे उत्पन्न कमी करण्याचा डाव रचला गेला.
ते म्हणाले, “आता डी-डॉलरायझेशन आणि डिग्लोबलायझेशनच्या युगात परकीय निधीवर चालणाऱ्या अनेक स्टार्टअप्स बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती, उत्पादन, खाद्य प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, संरक्षण आणि अवकाश या मूळ क्षेत्रांकडे परतण्याची तयारी ठेवावी.”
डॉ. शाह यांनी कुटुंब, समाज आणि व्यावसायिक समूहांची एकजूट मजबूत करण्याचे आवाहन केले.
“आपले पूर्वज समाजघटक, स्नेहमेळावे आणि धार्मिक उपक्रमांमुळे सशक्त सामाजिक बंध निर्माण करत. सतत १५-२० वर्षे समाजकार्य केले, तर त्या कार्यातून स्थायी प्रभाव निर्माण होतो,” असे त्यांनी सांगितले.
“जेव्हा जेव्हा सनातन ज्ञानाकडे दुर्लक्ष केले, तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागले आहेत.”
 
                                                    
 
                             
                                 
                                