पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) मध्ये आवश्यक शैक्षणिक व सेवा पात्रता नसतानाही ठराविक कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याचा गंभीर प्रकार शिवसेनेने सातत्याने उघडकीस आणला होता. रिक्त जूनियर क्लर्क पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध असताना, सुमारे २०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देण्यात आल्याने सेवा अटी, प्रशासकीय नियम व प्रक्रियेचे सरळ उल्लंघन झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता,या प्रकरणी निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी, तसेच संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. शिवसेनेच्या या आक्रमक पाठपुराव्याची दखल घेत PMPML चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. पृथ्वीराज बी. पी. यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रि-सदस्यीय समिती गठीत करण्याचा अधिकृत कार्यालयीन आदेश निर्गमित केला आहे.
विशेष बाब म्हणजे, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग करून ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आल्याचेही समोर आले आहे. शैक्षणिक पात्रता, सेवाज्येष्ठता, अनुभव, वयोमर्यादा व अन्य अनिवार्य अटी नियमानुसार पूर्ण होत नसतानाही कर्मचाऱ्यांना कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याच अनुषंगाने संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी होणार आहे.
या संदर्भात शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “PMPML मध्ये नियम डावलून ठराविक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. शिवसेनेने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच आज या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी सुरू झाली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.”
शिवसेनेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळेच PMPML मधील या संशयास्पद पदोन्नती प्रक्रियेची अधिकृत चौकशी सुरू झाली असून, या चौकशीतून प्रशासनातील अनियमितता, अधिकारांचा गैरवापर व संभाव्य भ्रष्टाचाराबाबतचे सत्य जनतेसमोर येणार आहे.
प्रशासनातील बेजबाबदारपणा व भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना यापुढेही आक्रमक भूमिका घेत राहील, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
