पुण्यातील मॉर्डन कॉलनी परिसरातील गार्डन विभागाचा गैरकारभार आता चव्हाट्यावर आला आहे.
आयुक्त बंगला ते गुंजन वाटिका, हिरवळ गार्डन, बजाज गार्डन आणि हिरो गार्डन या परिसरात कंत्राटी कामगारांची नावे हजेरीवर असतात… पण प्रत्यक्षात ते कामावर दिसतच नाहीत! कंत्राटी कामगार गैरहजर असतानाही पगार मात्र बिनबोभाटपणे काढला जातो. यामुळे कायमस्वरूपी कामगारांवर डबल-ट्रीपल कामाचा ताण येतो आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. गुंजन वाटिका परिसरात तर धक्कादायक चित्र आहे.
एका-दोन कर्मचाऱ्यांकडून अनेक गार्डनचे काम करून घेतले जाते. गार्डन विभागात १५ ते २० कर्मचारी असतानाही प्रत्यक्ष काम करणारे मोजकेच लोक दिसतात. यामुळे गार्डनची देखभाल ढासळली आहे. कचरा, गवत कापणी, झाडांची निगा — सगळीकडे दुर्लक्ष दिसून येते. याहून धक्कादायक बाब म्हणजे, गार्डनमधील साधने परस्पर विकली जात असल्याचे आरोप आहेत. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जातात. येथे कार्यरत महिला प्रभारी इन्चार्ज यांच्याबाबतही नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.फिरोदिया गार्डन, भोसले नगर गार्डन शिवाजी नगर दळवी गार्डन वाकडेवाडी बजाज गार्डन याठिकाणी असे सर्रास प्रकार सुरू आहेत. आयुक्तांच्या बंगल्याजवळच हा सगळा गैरकारभार सुरू असेल, तर शहराच्या इतर भागात काय सुरू असेल? कारवाई होणार का? की हा गोलमाल असाच सुरू राहणार?
रोखठोक महाराष्ट्र न्यूज प्रशासनाला जाब विचारत आहे —गार्डन विभागातील हजेरीची प्रत्यक्ष तपासणी कधी होणार? बोगस पगार काढणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? आपल्या भागातही पुणे महापालिकेच्या आरोग्य, उद्यान किंवा स्वच्छता विभागात गैरप्रकार सुरू असतील तर रोखठोक महाराष्ट्र न्यूजशी संपर्क साधा…आम्ही तुमचा आवाज बनू!
