हडपसर परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पथारी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात रस्ते आणि फुटपाथ व्यापल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नो हॉकर्स झोनमध्येही पथारी व्यवसायिक बसत होते, त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना उड्डाणपुलाखाली बसण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती.
मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलटीच झाली आहे.
एक परवाना असताना चार-चार भाडेकरू बसवले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील परिसरात पथारी व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
याचबरोबर काही अधिकाऱ्यांचे बगलबच्चे हप्ते गोळा करून या अतिक्रमणाला अभय देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.माळवाडी येथील साने गुरुजी हॉस्पिटल परिसर, पर्यायी रस्ते आणि फुटपाथवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप आहे.मात्र महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
काही वेळा कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ आणि दमदाटीचा सामना करावा लागतो, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते तानाजी घोलप यांनी महापालिकेला सर्वे करून परवानाधारक पथारी व्यवसायिकांना निश्चित जागा देण्याची आणि अनधिकृत अतिक्रमणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आता या गंभीर प्रश्नावर महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे हडपसरकरांचे लक्ष लागले आहे.
