भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
आतापर्यंत खरातवर 8 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून, SIT कडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या तपासात आता एक अत्यंत गंभीर आणि हादरवणारी माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, खरात आपल्या कार्यालयात काही विशिष्ट कोडवर्ड वापरत होता.
जेव्हा तो एखाद्या महिलेला ‘शुद्धीकरण’च्या नावाखाली केबिनमध्ये बोलवत असे, तेव्हा तो झुंबराची लाईट बंद करत असे.
हा संकेत असा असायचा की, त्या वेळेत कोणीही केबिनमध्ये प्रवेश करू नये.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ‘शुद्धीकरण’ हा शब्द चुकीच्या हेतूसाठी कोड म्हणून वापरला जात होता.
तसंच, ‘अवतार पूजा’ या नावाखाली लोकांना व्यवसायात यश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
खरात भक्तांना ‘जादुई तुर्की मध’ असल्याचे सांगून तब्बल 9 लाख रुपये प्रति किलो दराने विकत होता.
तपासादरम्यान 50 हून अधिक लोकांनी पुढे येत माहिती दिल्यामुळे, या प्रकरणाचा विस्तार वाढत चालला आहे.
दरम्यान, खरातच्या ‘विशेष भक्त परिवारात’ काही प्रभावशाली लोकांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
एका आमदाराच्या पत्नीचे नावही समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. ती सातत्याने त्याच्या संपर्कात होती आणि नाशिकमधील कार्यालयात ये-जा करत होती, असा दावा केला जात आहे.
सध्या SIT या सर्व बाबींचा सखोल तपास करत असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
