पुणे शहरातील शस्त्रपरवाना प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे पोलिसांचे माजी आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यांमध्ये कोणतीही बेकायदेशीरता आढळून आलेली नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
शस्त्र अधिनियम 1959 आणि शस्त्र नियम 2016 मधील सर्व अटी आणि तरतुदींचे पालन करूनच हे परवाने देण्यात आल्याचेही गृहविभागाने नमूद केले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर या शस्त्रपरवान्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळातील सर्व परवान्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. काही व्यक्तींना परवाने मिळवून देण्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोपही झाले होते.
मात्र, विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात एकूण ४३३ शस्त्रपरवाने मंजूर करण्यात आले आणि हे सर्व परवाने कायदेशीर प्रक्रियेनुसारच दिले गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच, जालिंदर सुपेकर आणि त्यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्तांबाबतही करण्यात आलेल्या चौकशीत कोणतीही अवैध मालमत्ता आढळून आलेली नाही. त्यामुळे ही चौकशी बंद करण्यात आली आहे.
गृहविभागाच्या या स्पष्टीकरणामुळे दोन्ही अधिकाऱ्यांवरील आरोपांना मोठा धक्का बसला आहे.
सध्या तरी या प्रकरणात अधिकृतपणे कोणतीही अनियमितता आढळलेली नाही, असे चित्र स्पष्ट झाले आहे.
