उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचं भासवून फसवणुकीचा प्रयत्न करणारा तोतया पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नेमकं काय घडलं?
प्रद्युम्न श्रीहरी पाटील या ४७ वर्षीय व्यक्तीने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी असल्याचं सांगत एका फसवणूक प्रकरणात मदत करण्याचं आमिष दाखवलं.
त्याने तक्रारदाराला कोर्टाबाहेर नुकसानभरपाई मिळवून देण्याचं आश्वासन देत १० टक्के रकमेची मागणी केली होती.
१ एप्रिल रोजी तो थेट पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात पोहोचला आणि स्वतःची ओळख वरिष्ठ अधिकारी म्हणून करून दिली.
मात्र त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांना संशय आला. चौकशी केल्यानंतर तोतयागिरी उघड झाली.
यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा समोर आली आहे… अशा तोतयांपासून सावध राहणं गरजेचं आहे.
