नमस्कार! तुम्हाला माहिती आहे का… झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा एक असा ‘समर पॅलेस’ आहे, जिथे प्रचंड उन्हातही एसीसारखा गारवा मिळतो? होय! उत्तर प्रदेशातील झाशीपासून फक्त २२ किलोमीटरवर असलेला ‘बरुआ सागर किल्ला’ आजही पर्यटकांना भुरळ घालत आहे.
१७०५ ते १७०७ दरम्यान ओरछाचे राजा उदित सिंह यांनी हा किल्ला बांधला. टेकडीवर वसलेला हा किल्ला खास उन्हाळ्यातील विश्रांतीसाठी तयार करण्यात आला होता.पुढे हा किल्ला झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे उन्हाळी निवासस्थान बनला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला विशाल ‘बरुआ सागर तलाव’ आणि उंचावरची रचना यामुळे येथे नैसर्गिक थंडावा कायम राहतो.आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, हा किल्ला त्या काळातील ‘हिल स्टेशन’च होता!
फक्त किल्लाच नाही, तर येथे बरुआ सागर तलाव, जराई-का-मठ मंदिर आणि शृंगी ऋषी मंदिर अशी अनेक आकर्षणे आहेत, जी पर्यटकांना मोहून टाकतात.आता योगी सरकारच्या ‘Adoption of Heritage’ योजनेमुळे या किल्ल्याचा कायापालट होत आहे.
लवकरच येथे ‘डेस्टिनेशन वेडिंग’सारखे भव्य सोहळेही आयोजित केले जाणार आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारा तलावाचा नजारा प्री-वेडिंग शूटसाठी अगदी परफेक्ट मानला जातो.जर तुम्ही उन्हाळ्यात थंड आणि ऐतिहासिक ठिकाण शोधत असाल, तर ‘बरुआ सागर किल्ला’ तुमच्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतो.
