पुण्यातील हडपसर परिसरातील गोसावी वस्तीमध्ये एक धक्कादायक आणि जीवघेणी परिस्थिती समोर आली आहे. सर्वे नंबर २०६ मधील पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण अवस्थेत असून ती कधीही कोसळू शकते, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही टाकी गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक पद्धतीने हलत आहे. टाकीचा पाया कमकुवत झाला असून आजूबाजूला राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
इतकेच नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही वारंवार या समस्येबाबत सांगण्यात आले, पण कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. अखेर प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळून नागरिकांनी क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अमोल नाना तुपे यांना घटनास्थळी बोलावले.
अमोल नाना तुपे यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी करत प्रशासनावर जोरदार टीका केली. “ही टाकी तात्काळ हटवली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. “लोकप्रतिनिधी केवळ मतांसाठी येतात, पण नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
जर वेळेत उपाययोजना झाली नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते आणि त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गोसावी वस्तीतील जीर्ण पाण्याची टाकी ठरतेय ‘डेथ ट्रॅप’; अमोल नाना तुपेंचा आंदोलनाचा इशारा!
