पुणे

हडपसरचा विकास रखडला? रुग्णालय नाही, मेट्रो नाही, ट्रॅफिकने जनता हैराण!

पुण्याचा सर्वात वेगाने वाढणारा भाग म्हणून ओळखला जाणारं हडपसर… पण विकासाच्या बाबतीत मात्र इथल्या नागरिकांचा संयम आता संपत चाललाय.
हडपसर, ससाणेनगर, काळेपडळ, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि आसपासच्या भागात लोकसंख्या प्रचंड वाढली… मोठमोठ्या टॉवर्स उभ्या राहिल्या… पण मूलभूत सुविधा मात्र अजूनही अपुऱ्याच आहेत.
सर्वात मोठी मागणी आहे ती मगरपट्टा चौकात अत्याधुनिक महापालिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची. कारण आजही अनेक नागरिकांना उपचारासाठी शहराच्या दुसऱ्या टोकाला जावं लागतं. ICU, डायलिसिस, प्रसूतीगृह, एक्स-रे, आपत्कालीन सेवा… या सुविधा परिसरातच मिळाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.
दुसरा मोठा मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडी… स्वारगेट ते लोणी काळभोर मेट्रो मार्गाची मागणी आता जोर धरू लागलीय. सकाळ-संध्याकाळ हडपसरमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. नागरिकांचा वेळ, इंधन आणि मानसिक त्रास दिवसेंदिवस वाढतोय.

हडपसर भाजी मंडईचं आधुनिकीकरण ही देखील मोठी गरज बनली आहे. पार्किंग नाही, स्वच्छता नाही, गर्दी प्रचंड… त्यामुळे मल्टी-स्टोरेज मार्केटची मागणी नागरिक करत आहेत.
प्रत्येक प्रभागात छोटी भाजी मंडई, उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि मुलांसाठी खेळाची साधनं उभारण्याची मागणीही जोर धरतेय.
याशिवाय उड्डाणपुलाखालील अनधिकृत विक्रेते, अपूर्ण रस्ते, रेल्वे क्रॉसिंगजवळील वाहतूक कोंडी, पार्किंगचा गोंधळ आणि ध्वनीप्रदूषण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे… डिजिटल युगातही परिसरात आधुनिक ई-लर्निंग शाळांची कमतरता असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
गटार समस्या, कचरा व्यवस्थापन, पिण्याचं पाणी, सार्वजनिक शौचालयं, स्ट्रीट लाईट आणि रस्ते दुरुस्ती या मूलभूत प्रश्नांवरही प्रशासनाने तातडीने काम करावं अशी मागणी आता जोर धरतेय.
हडपसर हा फक्त वाढता भाग नाही… तर पुण्याच्या विकासाचं भविष्य मानला जातो. पण जर मूलभूत सुविधा वेळेत मिळाल्या नाहीत… तर हा विकासच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
आता प्रश्न एकच… प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हडपसरकरांचा आवाज ऐकणार का?