पुण्यात पुन्हा एकदा भरदिवसा कोयता हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कात्रज चौक ते नवले ब्रिज मार्गावरील दत्तनगर चौकात एका रिक्षाचालकावर थेट धारदार कोयत्याने वार करण्यात आले.
सुरज माणिक काळे असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून, १८ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा थरार घडला. जुन्या वादाच्या रागातून तिघांनी मिळून हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दोन ते तीन वर्षांपूर्वी पॅसेंजर भरण्याच्या कारणावरून आरोपी आणि सुरज काळे यांच्यात वाद झाला होता. हाच राग मनात ठेवून आरोपींनी भररस्त्यात सुरजला गाठत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत सुरज काळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
आंबेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत बापूसो भोसले, गणेश धारपाले आणि गणेश ऊर्फ भावड्या धरपाळे या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार Rohit Pawar यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर उपरोधिक टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे.
पुण्यात भरदिवसा कोयता हल्ला! पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या
