देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणात आता सर्वात मोठा स्फोटक खुलासा समोर आला आहे. सीबीआयच्या ताब्यात असलेल्या आरोपी मनीषा हवालदार हिने चौकशीत थेट कबुली दिली आहे की… “होय, मी NEET पेपर फोडला!”
इतकंच नाही… तर ही प्रश्नपत्रिका कुणाच्या सांगण्यावरून फुटवली, याचाही धक्कादायक खुलासा तिने केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पॅनलमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हा संपूर्ण खेळ रचण्यात आला होता.
मनीषा हवालदारने सीबीआयसमोर दिलेल्या जबाबात सांगितलं की, परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना फिजिक्स विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पुरवण्यात आली होती. हे प्रश्न मनीषा मांढरे नावाच्या महिलेला थेट व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आले होते. याशिवाय मनीषा वाघमारेसोबतही सतत संपर्क आणि चर्चा सुरू होती.
दरम्यान, पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट्स आणि डेटा डिलीट केल्याचंही समोर आलं आहे. मात्र सीबीआयच्या सायबर टीमने हा डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सीबीआयने टाकलेल्या छाप्यात मनीषा हवालदारच्या घरातून फिजिक्सच्या संशयास्पद प्रश्नपत्रिका, मोबाईल, लॅपटॉप आणि तब्बल ६० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या डिजिटल उपकरणांमधून आणखी किती विद्यार्थ्यांना पेपर पुरवण्यात आला होता, याचाही मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
आता सीबीआयचं संपूर्ण लक्ष त्या कथित NTA अधिकाऱ्याकडे लागलं असून, देशभरात या रॅकेटचे धागेदोरे शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
NEET सारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
“होय, मी NEET पेपर फोडला!” | मनीषा हवालदारची CBI समोर धक्कादायक कबुली
