समाजासाठी सामाजिक बांधिलकी जपत नेहमी मदतीचा हात पुढे करणाऱ्या पुनावाला कुटुंबाचा सिरम एम्प्लॉईज युनियन आणि सर्व कामगारांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
हडपसर येथील सिरम कंपनीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कंपनीचे चेअरमन डॉ. सायरस पुनावाला, सीईओ आदर पुनावाला आणि मास्टर सायरस पुनावाला यांनी हा सन्मान स्वीकारला.
यावेळी युनियनच्या वतीने पुनावाला कुटुंबाला हॅन्डमेड पेंटिंग, कंपनीचा लोगो असलेली सोन्याची भेटवस्तू आणि विलू पुनावाला हॉस्पिटलसाठी तब्बल ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
कार्यक्रमाला एचआर डायरेक्टर महेंद्र इंगे, युनियनचे अध्यक्ष अजित भितांडे, उपाध्यक्ष अतुल कदम, सचिव अजित खैरे, खजिनदार सचिन गायकवाड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना युनियनचे संस्थापक अध्यक्ष सचिन गोपीनाथ तुपे यांनी पुनावाला कुटुंबाच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं.
ते म्हणाले, जगभरात लस निर्मितीत नाव कमावणारी सिरम कंपनी आता ६० वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे.
कंपनीतील सुमारे ११ हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी पुनावाला कुटुंबाने जपली आहे.
पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक मदतीसाठी पुनावाला कुटुंब कायम अग्रेसर राहत असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘आदर पुनावाला क्लीन सिटी’ उपक्रमांतर्गत पुणे शहरातील स्वच्छता मोहीम, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“सायरस बाबा आणि आदर बाबा हे सर्व कामगारांचे दैवत आहेत,” अशी भावनिक भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, वेल्फेअर मेडिकल फाउंडेशनच्या वतीनेही सिरम युनियन आणि कामगारांचे आभार मानण्यात आले.
या मदतीमुळे विलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गरजूंना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या कामाला आणखी बळ मिळणार असल्याचं सांगण्यात आलं.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पुनावाला कुटुंबाचा सिरम कामगारांकडून भव्य सत्कार
