पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एका बोगस डॉक्टरकडून घरामध्येच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीने गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे झाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले. यवत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली असून आणखी काही डॉक्टरांच्या सहभागाची माहिती समोर येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गर्भलिंग तपासणीसाठी 35 ते 50 हजार रुपये आकारले जात होते. पोलिस तपासात या रॅकेटमध्ये 7 ते 8 डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांत या नेटवर्कद्वारे तब्बल 500 हून अधिक गर्भपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भलिंग तपासणीनंतर महिलांना गर्भपातासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांकडे पाठवले जात होते. त्यामुळे या रॅकेटचे धागेदोरे पुणे ते अहिल्यानगरपर्यंत पसरले असल्याची चर्चा सुरू आहे.
मुलींच्या जन्मदरावर परिणाम करणाऱ्या आणि कायद्याला हरताळ फासणाऱ्या या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनही हादरले आहे. या संपूर्ण रॅकेटमागील मास्टरमाईंड कोण? आणखी किती जणांचा सहभाग आहे? आणि या 500 गर्भपातांमागील सत्य काय? याचा शोध आता पोलिस घेत आहेत
2 वर्षांत 500 गर्भपात? केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश
