पुणे

कुणाला वाईन्ससमोर दारुड्यांचा धिंगाणा, महिलांमध्ये भीतीचे वातावरण!

हडपसरच्या मांजरी फाटा चौकातील बसस्टॉप शेजारी असलेल्या कुणाल वाईन्ससमोर दररोज संध्याकाळी दारुड्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
चारचाकी गाड्या, रिक्षा आणि दुचाकींवर बसून उघडपणे दारू पिणे, गलिच्छ शिवीगाळ करणे, एकमेकांशी भांडणे आणि रस्त्यावर धिंगाणा घालणे हे येथे नित्याचेच झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचीही मोठी वर्दळ असते. किरकोळ कारणांवरून वाद होऊन अनेकदा हाणामारीच्या घटना घडतात.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, या वाईन्ससमोरच बसस्टॉप असल्यामुळे महिला, विद्यार्थिनी आणि लहान मुलांना दररोज या वातावरणाचा सामना करावा लागतो. बस किंवा रिक्षाची वाट पाहताना महिलांना भीतीच्या वातावरणात उभे राहावे लागते.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, चौकात वाहतूक पोलीस नियमितपणे ड्युटीवर असतात. मात्र काही अंतरावर सुरू असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नागरिकांची मागणी आहे की, वाईन्सच्या बाहेर उघड्यावर दारू पिण्यास तात्काळ बंदी घालावी. तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित वाईन्स चालकांवरही कारवाई करण्यात यावी.
यासोबतच उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

मांजरी फाटा चौक हा हडपसरमधील अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. मात्र येथे रोज उघड्यावर सुरू असलेला दारुड्यांचा धिंगाणा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता स्थानिक पोलिस आणि प्रशासन यावर नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.