पुण्यात हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, 156 तरुण-तरुणी ताब्यात!

Rokhthok Maharashtra 13 0

पुण्यात पुन्हा एकदा हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’वर मध्यरात्री छापा टाकत तब्बल १५६ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ते ७ जून दरम्यान एका खासगी फार्महाऊसवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीमध्ये परवानगीच्या वेळेनंतरही मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा आणि लोणीकंद पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
या कारवाईत १०७ पुरुष आणि ४९ तरुणी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी तीन जण २१ वर्षांखालील असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावरून अंदाजे ३ ग्रॅम गांजा, १० प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स, तसेच सुमारे ९ लाख २२ हजार रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी एकूण ८५ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले असून अमली पदार्थांच्या वापराशी संबंधित साहित्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या पार्टीचे मुख्य आयोजक आयमान शेख आणि यश चौधरी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर झालेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.