सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला आहे. मामाच्या गावाला जाण्यासाठी आनंदाने निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाने घाला घातला.
मुरूम येथील सेजल बोडरे (१७) आणि अक्षरा बोडरे (१५) या आपल्या लहान भावासोबत स्कुटीवरून बारामती तालुक्यातील मुर्टी गावाकडे जात होत्या. चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आणि एका टेम्पोची समोरासमोर भीषण धडक झाली.
धडक इतकी जबरदस्त होती की स्कुटीचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर पवन बोडरे (१२) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मामाच्या गावाला जाताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू
