पुणे

लग्न ठरलं, बस्ता बांधला… पण ऐनवेळी धक्का! अग्नीवीरवर गंभीर आरोप, परळी हादरलं

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरलं, बस्ता बांधला, पत्रिका छापल्या गेल्या… मात्र ऐनवेळी लग्न मोडलं आणि त्यानंतर गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, अग्नीवीर म्हणून कार्यरत असलेल्या भरत तोंडे याने लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्न होणार असल्याचे सांगून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तारीखही निश्चित केली होती. मात्र लग्नाच्या काही दिवस आधी आरोपीने लग्न करण्यास नकार दिला आणि धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच लग्नाच्या तयारीदरम्यान आर्थिक मागण्या करण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीसह कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात विलंब होत असल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, न्याय मिळत नसल्याचा दावा करत पीडितेने मुख्यमंत्रीांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली असून, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी विनंती केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.