पुणे

कदमवाकवस्तीचे माजी सरपंच chittranjan Gaikawad सह 10-12 जणांवर गुन्हा; जमीन वादातून मारहाण

पुण्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरात जमीन वादातून मोठा संघर्ष उफाळून आला असून, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, त्यांची पत्नी गौरी गायकवाड, मुलगा ओम गायकवाड आणि इतर 10 ते 12 जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, कवडीगाव येथील 50 वर्षीय सविता झगडे यांनी त्यांच्या कुटुंबाची संबंधित जमीन गेल्या अनेक दशकांपासून ताब्यात आणि वहिवाटीत असल्याचा दावा केला आहे. या जमिनीसंदर्भातील फेरफार आणि मोजणीचा वाद सध्या महसूल विभागात न्यायप्रविष्ट असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, 29 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सविता झगडे आणि त्यांच्या नातेवाईक महिला शेतात काम करत असताना चित्तरंजन गायकवाड आणि त्यांच्यासोबत आलेल्या 10 ते 12 जणांनी शेतात प्रवेश केला. फिर्यादीच्या आरोपानुसार, त्यांनी “ही जमीन आमची आहे, बाहेर निघा” असे सांगत महिलांना जबरदस्तीने शेताबाहेर ढकलले.
यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुळा आणि मक्याचे पीक नांगरून नुकसान करण्यात आले, पाण्याची पाइपलाइन तोडण्यात आली आणि सिमेंटचे खांब उभारण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
सायंकाळी पुन्हा क्रेनच्या सहाय्याने शेतात डेमो हाऊस बसवण्याचा प्रयत्न झाला. याला विरोध करणाऱ्या हर्षल झगडे आणि प्रणव झगडे यांना मारहाण करण्यात आली तसेच “पुन्हा शेतात दिसलात तर जीवे मारू” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणावरून लोणी काळभोर पोलिसांनी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ओम गायकवाड आणि इतर 10 ते 12 अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, फिर्यादीकडून असा दावाही करण्यात आला आहे की यापूर्वीही संबंधित जमिनीचा ताबा घेतेवेळी संबंधित महिलेला स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अश्सील शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दाखल आहे हवेली तालुक्यात भूमाफियांच्या वारंवार जमीन ताब्याच्या तक्रारी दाखल होत असल्याकारणाने हवेली तालुक्यातील भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पुणे शहरामध्ये महिला सुरक्षा व शेतकऱ्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण हा गंभीर प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे या भूमाफीयांना अभय देते तरी कोण या विषयाची चांगली चर्चा रंगली असताना कडक शिस्तबद्ध मानले जाणारे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार संबंधित इसमांवर काय कारवाई करणार हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे