मुंबईतील मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये अवघ्या एक रुपयांच्या सेलमुळे मोठा गोंधळ उडाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच हजारो ग्राहकांनी मॉलमध्ये धाव घेतली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
इन्फिनिटी मॉलमधील ‘न्यू मी’ फॅशन स्टोअरच्या एक रुपयांच्या सेलची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर शनिवारी हजारो तरुण-तरुणींनी स्टोअरबाहेर प्रचंड गर्दी केली.
गर्दी इतकी वाढली की अनेकांना गुदमरल्यासारखे झाले. सुरक्षा रक्षकांना परिस्थिती नियंत्रणात आणताना मोठी कसरत करावी लागली. अखेर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच स्टोअरने शटर बंद केले, तर मॉल प्रशासनाने लाऊडस्पीकरवरून एक रुपयांची ऑफर रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर हळूहळू गर्दी पांगली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही
