लोहगड खून प्रकरणात एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. सुरुवातीला पोलिसांनी केतन अग्रवालच्या मृत्यूची नोंद अपघात म्हणून केली होती. मात्र एका व्यक्तीच्या जिद्दीमुळे संपूर्ण हत्याकांड उघडकीस आलं.
१८ जून रोजी केतन अग्रवाल लोहगडावरून दरीत कोसळल्याची घटना घडली. त्यावेळी हा अपघात असल्याचं सर्वांना वाटलं. अंत्यसंस्कारही पार पडले.
मात्र केतनची बहीण शांत बसली नाही. भावाच्या मृत्यूबाबत तिच्या मनात अनेक प्रश्न होते. चार दिवसांनी सिया गोयल सांत्वनासाठी घरी आली असता, तिने सियाला घटनाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
मात्र सियाची विसंगत आणि उडवाउडवीची उत्तरं पाहून तिचा संशय अधिकच बळावला. ही बाब तिने कुटुंबीयांच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली. तपासाचा फास आवळत गेला आणि अखेर सिया गोयल व तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली.
एका बहिणीच्या चिकाटीमुळे आणि संशयामुळे अपघाताचा पडदा फाटला आणि कथित हत्येचं सत्य समोर आलं.
https://youtube.com/shorts/pZNLTZkjm74
