पुणे

तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राइक! बनावट औषधांचा काळाबाजार उघडकीस

राज्यात बनावट औषधांचा काळाबाजार किती खोलवर रुजला आहे, याचा मोठा पर्दाफाश अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA ची सूत्रे हाती घेतल्यानंतर भेसळमाफिया, गुटखा माफियांवर कारवाईचा धडाका सुरू केला होता. आता बनावट औषधांच्या आंतरराज्यीय रॅकेटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर विभागातील FDA अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबपर्यंत पसरलेल्या बनावट औषधांच्या साखळीचा भांडाफोड केला आहे. या कारवाईमुळे औषध व्यवसाय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान प्रसिद्ध कंपनीच्या नावाने बनावट औषधे बाजारात विकली जात असल्याचे समोर आले. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यातील महत्त्वाचे घटक निर्धारित मानकांपेक्षा अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढे संबंधित कंपनीने ही औषधे त्यांच्या कारखान्यात तयारच झाली नसल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारी बनावट औषधे बाजारात विकली जात होती.
याचबरोबर आणखी एका धक्कादायक प्रकरणात आयुर्वेदिक उत्पादन म्हणून विकल्या जाणाऱ्या कॅप्सूलमध्ये लपवून अ‍ॅलोपॅथिक औषधांचे घटक वापरण्यात आल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे उत्पादनाच्या लेबलवर याचा कोणताही उल्लेख नव्हता.
या संपूर्ण प्रकरणात अनेक वितरक, विक्रेते आणि उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासाचा फास आता आणखी आवळला जात आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA च्या या कारवाईमुळे बनावट औषधांचा काळाबाजार करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे