पुण्यात समाविष्ट झालेल्या १२ गावांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने या गावांच्या पाणीपुरवठा आणि पूरनियंत्रणासाठी तब्बल १२९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या अर्बन चॅलेंज फंडाच्या ऍपेक्स समिती बैठकीत पुणे महापालिकेच्या प्रस्तावांना हिरवा कंदील देण्यात आला. यामध्ये १२ गावांसाठी ८९० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणि शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी ४०० कोटी रुपयांच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
खडकवासला, धायरी, नांदोशी, जांभूळवाडी, कोल्हेवाडीसह १२ गावांमध्ये गेल्या वर्षी जीबीएस या जलजन्य आजाराने थैमान घातले होते. अनेक नागरिक आजारी पडले, तर काहींना जीवही गमवावा लागला. या गावांना आजही शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नवीन योजनेनुसार २०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच ७१ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी आणि ३९० किलोमीटरची वितरण वाहिनी टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पातून २०५२ पर्यंत सुमारे ७ लाख ७८ हजार नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
याशिवाय, शहरातील ३३५ पूरग्रस्त ठिकाणी पावसाळी जलनिस्सारणाची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि मालमत्तेचे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणेकरांसाठी ही योजना गेमचेंजर ठरणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
