पुणे, दि. 6: जिल्ह्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीच्यादृष्टीने पीकनिहाय क्लस्टर तयार करून विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमातून नियोजन करुन आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कृषी विषयक योजनांच्या अंमलबजावणी व नियोजनाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, विविध कृषी संशोधन केंद्रे यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व कृषी निर्यातदार आदी उपस्थित होते.
या बैठकीत फलोत्पादन पिकामधील क्षेत्र वाढ, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे, शेतमालाच्या निर्यातीमध्ये वाढ करणे आदीबाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील केळी, ऊस, द्राक्ष, अंजीर, डाळिंब, आंबा, तेलबिया, कडधान्य, तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढ, निर्यातवृद्धीसंदर्भात येणाऱ्या अडचणी शासनाकडून आवश्यक असणारी मदत याबाबत मुद्दांवर चर्चा करण्यात आली. ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख पिक असून ऊसातील पाचट व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, बेणे बदल यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे वसंतदादा शुगर इन्स्ट्यिूटचे प्रतिनिधींनी सांगितले. फळपिकाच्या बाबतीत यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, नवीन वाणांचा वापर, शीतगृह सुविधा आवश्यक असल्याचे फलोत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.