पुण्यात घुमली ‘छात्रों की गुंज’; विद्यार्थ्यांसाठी भव्य कॅन्डल मार्च!
पुण्यात “छात्रों की गुंज” मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पुणेकर सहभागी झाल्याचा दावा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
NEET परीक्षेसंदर्भातील कथित पेपरफुटी, विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईचा निषेध आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईबद्दल सरकारने जाहीर माफी मागावी आणि प्रभावित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
आयोजकांच्या माहितीनुसार, मार्चमध्ये कोणत्याही पक्षाचा राजकीय झेंडा न वापरता सहभागी नागरिकांनी हातात तिरंगा आणि मेणबत्त्या घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.
या आंदोलनात काँग्रेसचे पुणे पूर्व शहराध्यक्ष प्रशांत जगताप, चंदूशेठ कदम, गोपालदादा तिवारी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.





