‘सिया’च्या जाळ्यात पोलीस पाटील! ५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पुण्यात ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ५६.२५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीचा बळी ठरले आहेत मुळशी तालुक्यातील एक पोलीस पाटील.
सोशल मीडियावरील एका बनावट ब्रोकरेज कंपनीच्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तक्रारदाराला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर स्वतःला “सिया” असे सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधून ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.
सुरुवातीला ॲपमध्ये बनावट नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. कमी दरात IPO शेअर्स मिळतील, असे आमिष दाखवत नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान तक्रारदाराकडून ५६.२५ लाख रुपये गुंतवून घेण्यात आले.
ॲपमध्ये गुंतवणुकीचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच आणखी ३० लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने नकार दिल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला.
या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात “सिया” नावाच्या महिलेसह इतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





