दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी दिलं स्पष्ट उत्तर!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता स्वतः शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांनी विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी एका शब्दात ही शक्यता फेटाळून लावली. “असे काहीही होणार नाही,” असे स्पष्ट सांगत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रच राहतील, असा संदेश दिला.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट एनडीएला पाठिंबा देणार किंवा सरकारमध्ये सहभागी होणार, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली भेट आणि इतर राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले होते.
मात्र, शरद पवार यांच्या स्पष्ट वक्तव्यानंतर या सर्व चर्चांवर पडदा पडला आहे.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत आणखी पंधरा दिवस शासनाचा निर्णय पाहूनच प्रतिक्रिया देऊ, असेही शरद पवार यांनी सांगितले.





