पुण्यात गँगवॉरचा नवा कट? पोलीस व्हॅनचा पाठलाग करताना दोघे अटकेत!
पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदेकर टोळीच्या सदस्यांना कोर्टातून कारागृहात नेत असताना त्यांच्या पोलीस व्हॅनचा पाठलाग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सहकारनगर येथील मोक्का प्रकरणाच्या सुनावणीसाठी आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांना शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते.
सुनावणी संपल्यानंतर त्यांना पुन्हा धुळे आणि नंदुरबार कारागृहात नेत असताना दोन संशयित दुचाकीस्वार पोलीस व्हॅनचा सातत्याने पाठलाग करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. चाकणजवळ पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी दुचाकी सोडून पळ काढला.
या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी वेदांत सावंत आणि अथर्व खोपडे या दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून आयुष कोमकर, गणेश आणि अक्षय म्हस्के यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सुरज ठोंबरे याने तुरुंगातून कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.





