हिंजवडीत लव्ह ट्रँगलचा रक्तरंजित शेवट! एक्सच्या प्रियकरावर 14 वार, तरुणाची निर्घृण हत्या
पुण्यातील हिंजवडीत प्रेमाच्या त्रिकोणातून घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. एक्स गर्लफ्रेंडच्या प्रियकराची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या करण्यात आली, तर तरुणीवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला.
माहितीनुसार, सागर गायकवाड हा हिंजवडीतील एका पीजीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. निकिता दनाने ही तरुणी तेथे राहण्यासाठी आली होती आणि तिने सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, गुरुवारी दुपारी दिनेश महादेव झांबरे पीजीमध्ये आला. निकिता ही माझी प्रेयसी असल्याचे सांगत तो थेट तिच्या खोलीत पोहोचला. काही क्षणांतच आरडाओरडा सुरू झाला. दिनेशने लोखंडी रॉडने सागरवर सलग १३ ते १४ वार करत त्याची हत्या केली. हल्ला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या निकितालाही त्याने गंभीर जखमी केले.
प्राथमिक तपासानुसार, दिनेश आणि निकिता यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. मात्र पुण्यात आल्यानंतर निकिताचे सागरसोबत संबंध निर्माण झाल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून, खून आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





