“भरपूर पैसे असतील तर पुरस्कार देणारे दलालही आहेत!” लंडनच्या पुरस्कारांवर अ‍ॅड. सरोदे यांचा हल्लाबोल

Rokhthok Maharashtra 3 0

लंडनमधील पुरस्कारांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडनमध्ये पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर महाराष्ट्राची शान वाढल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी या पुरस्कारांवरच गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
अ‍ॅड. सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, हे पुरस्कार थेट ब्रिटन सरकार किंवा यूके पार्लमेंटकडून दिले जात नाहीत. इंडो-युरोप बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांसारख्या खासगी संस्थांकडून हे पुरस्कार दिले जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
इतकंच नाही तर, “भरपूर पैसे असतील तर असे पुरस्कार मिळवून देण्यासाठी दलालसुद्धा आहेत,” असा गंभीर आरोप अ‍ॅड. सरोदे यांनी केला आहे.
पुरस्कार सोहळा यूके पार्लमेंटमधील सभागृहात होत असला, तरी खासगी संस्थांना कार्यक्रमांसाठी हा हॉल वापरण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे थेट यूके सरकार किंवा ब्रिटिश संसदेकडून मिळालेला सन्मान आहे, असा गैरसमज करून घेऊ नये, असे सरोदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून वागत असल्याचा टोलाही अ‍ॅड. असीम सरोदे यांनी लगावला.
आता या पुरस्कारांबाबत अ‍ॅड. सरोदे यांनी केलेल्या दाव्यांवर एकनाथ शिंदे किंवा संबंधित संस्थांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.