बैल बाजार रोडवर खड्ड्यांना दगडांची मलमपट्टी; नागरिक संतप्त!
कराड शहरातील बैल बाजार रोडवरील खड्ड्यांवर दगडांची मलमपट्टी करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गौरी-गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र बैल बाजार रोडवर डांबरी पॅचिंगऐवजी मोठ्या आकाराची दगड-खडी टाकण्यात आली आहे.
या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असून, मोठ्या वाहनांमुळे दगड उडून पादचारी आणि वाहनचालकांना इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इंद्रजीत भोपते आणि सतीश भोंगाळे यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत, खड्डे योग्य पद्धतीने डांबरी पॅचिंग करून बुजवावेत, अशी मागणी केली आहे.
आज शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत दगड-खडी हटवून रस्ता सुरक्षित केला नाही, तर उद्या शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैल बाजार रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित बिल्डर सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.





