अजित पवार राष्ट्रवादीला पुण्यात मोठा धक्का! सरपंचासह 6 सदस्य अपात्र
पुण्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. ग्रामपंचायत कराची थकबाकी विहित मुदतीत न भरल्याने अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
अपात्र ठरलेल्यांमध्ये सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय डगळे, सारिका विश्वनाथ पदमुळे आणि कविता अशोक चौरे यांचा समावेश आहे.
भाजे ग्रामपंचायतीत यापूर्वी सरपंचासह अजित पवार राष्ट्रवादीचे सात आणि भाजपचे तीन सदस्य असे बलाबल होते. मात्र सहा जण अपात्र झाल्यानंतर भाजपचे तीन आणि अजित पवार राष्ट्रवादीचा अवघा एक सदस्य उरला आहे.
दरम्यान, अपात्र सदस्यांनी भाजपने षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात प्रताप कैलास गरवड आणि शेखर चंद्रकांत दळवी यांनी विवाद अर्ज दाखल केला होता.
आता अपात्र सदस्यांना अपील करण्याची संधी आहे. स्टे मिळाल्यास सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहू शकतात. मात्र स्टे न मिळाल्यास प्रशासक नेमण्याची आणि त्यानंतर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजे ग्रामपंचायतीची सत्ता आता कोणाच्या हातात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





