शिंदे घराण्यात ४१ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद; आणखी एका मुलीची कोर्टात एन्ट्री!
शिंदे घराण्यात ४१ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद; कुटुंबातील आणखी एका मुलीची कोर्टात एन्ट्री!
ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील तब्बल ४१ हजार कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट आला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या दिवंगत पद्माराजे यांच्या मुली प्रतिमा देवी यांनी या संपत्ती वादात आपला हक्क सांगत कोर्टात धाव घेतली होती.
आता ग्वाल्हेर जिल्हा कोर्टाने त्यांचा अर्ज सुनावणीसाठी स्वीकारला आहे. त्यामुळे प्रतिमा देवी यांना या बहुचर्चित संपत्ती वादात आपली बाजू मांडता येणार आहे.
प्रतिमा देवी यांचा दावा आहे की, त्यांची आई पद्माराजे या शिंदे घराण्याच्या कन्या होत्या. त्यामुळे आपल्या आईच्या वाट्याच्या आधारावर कुटुंबाच्या मालमत्तेत समान हक्क मिळायला हवा.
मात्र, या दाव्याला इतर पक्षकारांनी विरोध केला आहे. यापूर्वी झालेल्या तडजोडीला प्रतिमा देवींची सहमती होती आणि संबंधित कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षरी केली होती, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
म्हणूनच आता पुढील सुनावणीत प्रतिमा देवींच्या दाव्याचा कायदेशीर आधार काय? त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत? आणि संपत्तीत त्यांचा वाटा किती असू शकतो? हे महत्त्वाचं ठरणार आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे.
म्हणजेच, शिंदे राजघराण्यातील आधीच गाजत असलेल्या संपत्ती वादात आता आणखी एका कुटुंबीयाची एन्ट्री झाली आहे.
आता या ४१ हजार कोटींच्या संपत्तीचं अंतिम वाटप कोणाच्या वाट्याला किती येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





