तुकाराम महाराजांच्या पालखी तळावर अतिक्रमणाचा धोका?
कदम वाक वस्ती येथील पालखी स्थळाच्या जागेच्या हद्दी निश्चित करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामासाठी ही जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेची मोजणी झालेली असली, तरी हद्द कायम करण्याचे काम अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे.
स्थानिक कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीकडून भूमी अभिलेख कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, हद्दी निश्चित न झाल्याने काही अनधिकृत प्लॉटिंग धारकांकडून परवानगी न घेता ओढे बुजवून सिमेंट नळ्या टाकून रस्ता लेव्हलिंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.
यामुळे भविष्यात पालखी तळाच्या जागेवर अतिक्रमणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अधिकृत हद्द निश्चित होईपर्यंत पालखी तळावर कोणतेही अतिक्रमण होऊ नये, यासाठी लोणी काळभोरचे अप्पर तहसीलदार यांनी दखल घेत मंडल अधिकारी आणि तलाठी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केल्याची प्राथमिक माहिती आहे.
आता रयत क्रांती संघटना तसेच काही सामाजिक आणि हिंदुत्ववादी संघटना भूमी अभिलेख कार्यालयाकडून अधिकृत हद्द निश्चित करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.





