फुरसुंगीत तरुणावर बांबूने हल्ला; भावालाही मारहाण

Rokhthok Maharashtra 5 0

फुरसुंगी परिसरात गाडीचे काम करत असताना झालेल्या वादातून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर लाकडी बांबूने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांच्या भावाला दुखापत झाली असून फुरसुंगी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सूरज रमेश देवकर, वय ३५, रा. इंदिरा वसाहत, फुरसुंगी, असे फिर्यादीचे नाव आहे. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सूरज देवकर हे कुस्ती आखाड्याजवळ पार्क केलेल्या आपल्या टेम्पो ट्रॅव्हलरचे काम करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी प्रमोद राखपसरे, प्रमेश उर्फ भावड्या राखपसरे आणि विशाल उर्फ भावड्या भोसले यांनी सूरज देवकर यांच्याशी वाद घालत लाकडी बांबूने मारहाण केल्याचा आरोप आहे.
आरडाओरड ऐकून सूरज यांचा भाऊ सुनील देवकर भांडण सोडवण्यासाठी आला असता, त्यालाही तिघांनी मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर सूरज देवकर यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारानंतर सूरज देवकर यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.