लहान मुलांच्या हातातील मोबाईल ठरतोय चिंतेचा विषय!

Rokhthok Maharashtra 9 0

 

लहान मुलं रडायला लागली की त्यांच्या हातात मोबाईल देणं… आज अनेक घरांमध्ये ही गोष्ट अगदी सहज घडताना दिसते.

मुलं शांत होतात… जेवण करतात… हट्ट थांबतो…

पण प्रश्न असा आहे की, मुलांना शांत करण्यासाठी दिलेला मोबाईल त्यांच्या सवयीचा भाग बनला तर?

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या झोपेवर, डोळ्यांवर आणि दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

चला पाहूया, याच विषयावरची अक्षय चव्हाण यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट.

आज आपण पाहतो… लहान मुलं रडायला लागली, जेवण करत नाहीत, हट्ट करतात किंवा शांत बसत नाहीत… की पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात.

काही वेळासाठी मुलं शांत होतात… पण हळूहळू मोबाईल हीच त्यांची सवय बनू शकते.

जेवताना मोबाईल… खेळताना मोबाईल… झोपण्यापूर्वी मोबाईल…

मुलांच्या बालपणातला संवाद, खेळ आणि कुटुंबासोबतचा वेळ कमी होण्याची शक्यता निर्माण होते.

पण पालकांनो, मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल हाच एकमेव पर्याय आहे का?

नाही!

मुलांशी संवाद साधणं, त्यांना वेळ देणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांच्यासोबत खेळणं… हे अधिक महत्त्वाचं आहे.

🧠 मोबाईलच्या अतिवापराचे मुलांवर होणारे परिणाम

१. झोपेवर परिणाम

सतत स्क्रीन पाहणं, विशेषतः झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणं, मुलांच्या झोपेच्या वेळापत्रकावर परिणाम करू शकतं.

झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर थकवा, चिडचिडपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी जाणवू शकतात.

२. डोळ्यांवर ताण

मोबाईलच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्याने डोळ्यांचा थकवा, कोरडेपणा, जळजळ आणि डोकेदुखी अशा तक्रारी होऊ शकतात.

३. मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम

लहान मुलांच्या विकासासाठी पालकांशी संवाद, खेळ, प्रत्यक्ष अनुभव आणि सामाजिक संपर्क महत्त्वाचे असतात.

स्क्रीनचा अतिवापर या गोष्टींना वेळ कमी करून देत असेल, तर मुलांच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता असते.

४. मोबाईलची सवय

रडणं थांबवण्यासाठी किंवा जेवण घालण्यासाठी प्रत्येक वेळी मोबाईल दिला, तर मुलं शांत होण्यासाठी स्क्रीनवर अवलंबून राहण्याची सवय लावून घेऊ शकतात.

👨‍👩‍👧‍👦 पालकांनी काय करावे?

मुलं रडत असतील तर त्यांच्या हातात लगेच मोबाईल देण्याऐवजी त्यांच्याशी बोला…
त्यांना जवळ घ्या त्यांच्यासोबत खेळा कथा सांगा बाहेर फिरायला घेऊन जा

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दररोज आपल्या मुलांसाठी वेळ काढा!

मोबाईल कमी करण्याची सुरुवात मुलांपासूनच नाही, तर पालकांपासूनही झाली पाहिजे.

मुलांना मोबाईल देऊ नका असं म्हणताना आपण स्वतः किती वेळ मोबाईल वापरतो, याचाही विचार करायला हवा.

पालकांनो, मुलांना महागडी खेळणी देण्यापेक्षा तुमचा वेळ द्या

मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा तुमचा चेहरा त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.

मुलांच्या हातात मोबाईल देऊन काही क्षणांची शांतता मिळेल…

पण त्यांच्या आयुष्यात संवाद, प्रेम आणि संस्कार देऊन त्यांचं भविष्य घडवता येईल.

मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवा… मुलांना वेळ द्या… आणि त्यांचं बालपण जपा!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.