ठाण्यात नात्याला काळिमा! 19 वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचाराचा आरोप; 3 भावांविरोधात कारवाई
ठाण्यातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
१९ वर्षीय तरुणीवर तिच्याच तीन चुलत भावांनी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिला मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
धमकीमुळे पीडित तरुणी अनेक महिने गप्प राहिली. मात्र अखेर धाडस करून तिने आपल्या आईला संपूर्ण आपबिती सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सुरुवातीला कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात घटनास्थळ कापूरबावडी पोलिसांच्या हद्दीत असल्याचे समोर आल्यानंतर हा तपास कापूरबावडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात पाठवण्यात आलं आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





