फुरसुंगी-उरुळी देवाची येथे BPCL ला १२ एकर जागा! बायो-CNG प्रकल्पाला मंजुरी.
पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपो परिसरातील तब्बल १२ एकर जागा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात BPCL ला देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
कचर्यापासून बायो-CNG निर्मिती करणारा प्रकल्प या जागेवर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून दररोज ३०० मेट्रिक टन ओल्या कचर्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, प्रकल्पाची उभारणी, देखभाल आणि दुरुस्तीचा संपूर्ण खर्च BPCL कडून केला जाणार आहे. महापालिकेला जागा आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
या प्रकल्पासाठी १२ एकर जागा दोन वर्षांच्या उभारणीच्या कालावधीसह पुढील २५ वर्षांच्या कार्यान्वयन व देखभालीसाठी, म्हणजेच एकूण २७ वर्षांसाठी, प्रति एकर प्रतिवर्ष केवळ एक रुपया या नाममात्र भाडेदराने देण्याचा प्रस्ताव आहे.
पुणे शहरात दररोज सुमारे २७०० ते २८०० मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. मात्र, ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे सध्या केवळ ५९५ मेट्रिक टन प्रतिदिन इतकी स्थापित क्षमता उपलब्ध आहे.
त्यामुळे BPCL च्या या बायो-CNG प्रकल्पामुळे पुण्यातील ओल्या कचर्याच्या प्रक्रियेला कितपत गती मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





